पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) निवडणुकीच्या प्रक्रियेत झालेल्या गोंधळाबाबत विद्यमान अध्यक्ष, मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्तांसह इतरांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मतदार यादीतील त्रुटींमुळे निवडणूक पुढे ढकलण्याची नामुष्की असोसिएशनवर ओढवली आहे. निवडणुकीला काही तास उरले असताना हा निर्णय घेण्यात आला होता. या सर्व प्रकारामुळे नाराजी व्यक्त करीत पीबीएच्या काही माजी अध्यक्षांनी बार कौन्सिलकडे तक्रार केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता दाखवली नाही तर त्याचे निवडणुकीवर वाईट परिमाण होवू शकतो. त्यामुळे निवडणुकीबाबतचा वाद लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी त्यात करण्यात आली होती.
माजी अध्यक्षांनी केलेली तक्रार आणि मतपत्रिकेची छाननी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे बार कौन्सिलने ही नोटीस बजावली आहे. पीबीएचे अध्यक्ष अॅड. केतन कोठावळे, मुख्य निवडणूक आयुक्त ॲड. एन. डी. पाटील, मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. दादाभाऊ शेटे आणि उप-निवडणूक अधिकारी अॅड. योगेश देशमुख यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारी (ता. १४) प्रत्यक्षात बार कौन्सिल समोर चौकशीसाठी हजर व्हावे, असे नोटिशीत नमूद आहे.