पुणे – गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामामुळे नागरिक समाधानी आहेत. वडगाव शेरी मतदार संघातून प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा कौल भाजपला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मी पुन्हा जिंकणार असल्याचा मला विश्वास असल्याचे महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी सांगितले.
वडगावशेरी मतदार संघात जगदीश मुळीक यांनी कळस भागात प्रचारयात्रा काढण्यात आली. यावेळी मुळीक बोलत होते. माजी आमदार बापूसाहेब पठारे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, नगरसेवक संजय भोसले, अनिल टिंगरे, फरजाना शेख, नाना सांगडे, ऐश्वर्या जाधव, आनंद गोयल, अशोक कांबळे, चंद्रकांत टिंगरे, किरण भालेराव, राजू साखरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, वडगावशेरीत शाश्वत विकासकामे केली. केंद्र-राज्य शासन आणि पालिकेच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणला. या कामांची दखल मतदार घेतील. आजही अनेक कामे सुरू आहेत. प्रचार यात्रेदरम्यान नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विजय सुखकर वाटत आहे.
माजी आमदार पठारेंसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. तसेच विकासकामांमुळे आपला आमदार म्हणून नागरिकांशी माझी नाळ जोडली गेल्याने मतदारांचा कौल आपल्याच पारड्यात असेल, असा दावाही मुळीक यांनी केला.