कोपरगाव -करोनाच्या संकट काळात रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. कोपरगाव तालुक्यात पोलिसांची संख्या कमी असल्याने लॉकडाऊन काळात करोनाची लागन कोपरगावला होवू नये, याची दक्षता घेण्यासाठी करावी लागणारी मेहनत व टेहळीत पोलीसांना रात्रंदिवस खडा पहारा द्यावा लागत आहे. याची जाणीव लक्षात घेवून शहरातील काही स्वयंसेवकांनी हात काठी घेवून पोलिसांच्या खांद्याला खांदा देवून मदतीला रस्त्यावर उतरले.
करोना महामारीतून शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक दिवसांपासून शहरातील विविध चेक नाक्यावर दिवसरात्र खडा पहारा देवुन अनोखी देशसेवा केली.
स्वयंसेवकांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, साईबाबा कॉर्नर, टाकळी नाका, टाकळी फाटा अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी स्वयंसेवक सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 अशी 24 तास स्वतःची जबाबदारी पार पाडीत होते.
दरम्यान इतर जिल्ह्यातील व रेड झोनमधील वाहने तपासणे, विनापरवानगीच्या वाहनांना शहरात प्रवेश न देणे, नागरिकांना मास्क वापरण्यास सांगणे, छुप्या मार्गाने शहरात प्रवेश केलेल्या किंवा करणाऱ्या नागरिकांना प्रशासनामार्फत आवश्यकता वाटल्यास क्वारंटाइन करणे आदी कर्तव्य स्वयंसेवक करीत होते. त्याच बरोबर गरजुंसाठी अन्नदान करण्याचे काम केले. तसेच प्रवाशांसाठी भोजन व्यवस्था करण्याचे काम स्वयंसेवी करीत होते. कोपरगावच्या स्वयंसेवकांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.