रांजणगाव गणपती -श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टची दरवर्षी भरवण्यात येणारी भाद्रपद महोत्सव यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. तर भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय “शेमारो भक्ती’ या ऍपवर केली असल्याची माहिती डॉ.संतोष दुंडे यांनी दिली आहे.
श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थानतर्फे वर्षभरामध्ये विविध उत्सव व पारंपरिक सण साजरे केले जातात. परंतू शासनाने करोना महामारीमुळे धार्मिक कार्यक्रम व मंदिर उघडण्यास परवानगी नाही. या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना “श्रीं’च्या मुक्तद्वार यात्रेकरीता परवानगी कामी पत्रव्यवहार केला होता;
परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी भाद्रपद द्वारयात्रा हा धार्मिक सोहळा करता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथे या वर्षी गुरुवार (दि.20) ते मंगळवार (दि.25) या कालावधीत दर्शन, मुक्तद्वार दर्शन व जलाभिषेक बंद असणार आहे.
पालखी सोहळा, भाविकांची दंडवते, कीर्तन, भजन असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे ऍड. विजयराज दरेकर यांनी सांगितले. मंदिर बंद असून भाविकांनी दर्शनासाठी येवू नये. आपले कुटुंबीय सुरक्षित राहण्यासाठी घरी रहा व सुरक्षित रहा असे आवाहन नारायण पाचुंदकर व शेखर देव यांनी केले आहे.