‘करोना प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल’

मृत्यूदर कमी करण्यावर भर

डॉ. राजेश देशमुख : जिल्हाधिकारी पदभार स्वीकारला

पुणे – जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या जास्त असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सुविधाही पुरेशा आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोनावर उपाययोजना करून मृत्यूदर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा आणि ग्रामीण भागाच्या यंत्रणांतील समन्वयाने पुढच्या तीन आठवड्यांत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल, अशा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला.

डॉ. देशमुख यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्याचा पदभार बुधवारी स्वीकारला. त्यांनतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. आयएएस श्रेणीत निवड झाल्यानंतर डॉ. देशमुख यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले.

पुढे यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. तेथे कापसावरील विषारी फवारणीमुळे एकाचवेळी 22 जणांचा मृत्यू झाला होता. डॉ. देशमुख यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वत: फवारणीयंत्र हाती घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पुढे नंतरच्या दोन वर्षांत तेथे विषारी फवारणीमुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.