नवी दिल्ली – भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याच्यावर घणाघाती टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मॅक्सवेल दमदार खेळी करतो मात्र, आयपीएल स्पर्धेतील एकाही सामन्यात गांभीर्याने खेळ करत नाही. तो आयपीएल खेळण्यासाठी येतो तेव्हा मजा मस्ती, नृत्य सर्वकाही करतो पण धावा करत नाही, अशा शब्दात सेहवागने आपला संताप व्यक्त केला आहे.
मॅक्सवेल क्रिकेटपेक्षा गोल्फबाबत जास्त गंभीर आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याची फलंदाजी बहरते. मात्र, आयपीएलमध्ये तो अपयशी ठरतो. तो मजा करतो, मस्ती करतो, नृत्यही करतो फक्त धावा करत नाही. आयपीएल खेळताना त्याला माहीत असते की सुमार खेळ केला तरीही संघातील स्थान कायम राहील. तो आयपीएलमध्ये केवळ पैसे कमावण्यासाठीच येतो, असेही सेहवागने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून खेळताना सुमार कामगिरी झाली तर त्याचे संघातील स्थान धोक्यात येणार याची त्याला कल्पना असते. आयपीएलमध्ये तसे होत नाही. कोणताही खेळाडू अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात नसला तरी 1.5 मिलियन डॉलर मिळतात. जेव्हा प्रत्यक्षात सामना खेळत नाही तेव्हा 20 ते 30 टक्के रक्कम कपात होते. त्यामुळे खेळाडू नुसता बसून राहिला तरीही पैसे मिळतात. हे मॅक्सवेलला चांगलेत माहीत आहे, असेही सेहवाग म्हणाला.
मॅक्सवेलने यंदा अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने 13 सामने खेळताना केवळ 108 धावा केल्या आहेत. वादळी फलंदाजीसाठी ओळखला जात असलेल्या मॅक्सवेलला या स्पर्धेत एकही षटकार फटकावता आलेला नव्हता. यंदाच्या स्पर्धेत तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. सातत्याने अपयशी ठरलेला मॅक्सवेल भारताविरुद्धच्या मालिकेत मात्र, सातत्याने धावा करत आहे.
भारताविरुद्ध मॅक्सवेलचे यंदाचे सातत्य
पहिला एकदिवसीय सामना – 45 धावा
दुसरा एकदिवसीय सामना – नाबाद 63 व 1 बळी
तिसरा एकदिवसीय सामना – 59 धावा
पहिला टी-20 सामना – 2 धावा
दुसरा टी-20 सामना – 22 धावा
तिसरा टी-20 सामना – 54 धावा व 1 बळी