पाचगणी (प्रतिनिधी) – महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, त्यांचे पती व “हेवीवेट’ नगरसेवक कुमार शिंदे यांच्यासह चार नगरसेवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. महाबळेश्वरच्या राजकारणात हा भूकंप मानला जात आहे. राजकीय भूकपांचा केंद्रबिंदू युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे व कुमार शिंदे हे मानले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांची कोडी करत, विकासाची घोडदौड थांबवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असताना भाजपकडून नगराध्यक्षांना कोणतीच मदत मिळालेली नाही. त्यामुळे स्वप्नाली शिंदे यांनी भाजपविरोधात बंड करून, कॉंग्रेसला “हात’ देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित त्या पती व समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
महाविकास आघाडीच्या तीन चाकी सरकारचा कारभार राज्यात सुरू असून, या सरकारचा घटक असलेल्या कॉंग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टीने विराज शिंदे पक्षाची व्यूहरचना करत आहेत. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा श्रीगणेशा महाबळेश्वर पालिकेत होणार असल्याचे स्वप्नाली शिंदे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
महाबळेश्वरच्या विकासाचा वारू रोखण्यासाठी विरोधी 13 नगरसेवकांनी मोट बांधली असताना, कुमार शिंदे यांनी विराज शिंदेंना बरोबर घेऊन कॉंग्रेसमधून पुढील राजकीय वाटचाल करायचे ठरवले आहे. महाबळेश्वरच्या राजकारणात राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद असताना, आता कुमार शिंदे यांच्या माध्यमातून विराज शिंदे यांची खेळी महबळेश्वरच्या राजकारणात महत्त्वाची समजली जात आहे; परंतु राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी करण्यात स्वप्नाली शिंदे यांचा उपयोग किती होणार, हे भविष्यात स्पष्ट होईलच.
महाबळेश्वर, वाई, खंडाळा मतदारसंघात विराज शिंदे यांचे राजकीय बळ वाढवण्यासाठी हा राजकीय भूकंप कितपत कारणीभूत ठरेल, याची उत्सुकता आहे; परंतु कॉंग्रेसचा “हात’ कुमार शिंदे यांना बळकटी देणार, हे मात्र नक्की आहे.