वाघोली (ता. हवेली) (प्रतिनिधी)- येथील 24 तास मेडिकलवर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग व लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.
सातव पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, वाघोली येथे जाधव यांचे ट्वेंटी फोर सेवन मेडिकल सुरू आहे. मेडिकलमधून दोन महिन्यांपासून दिवसरात्र मेडिकल व्यतिरिक्त इतर खाद्यपदार्थ शीतपेये तसेच सुपर मार्केटचे पदार्थ विनापरवाना विकले जात आहेत.
करोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार सुरू आहे. मेडिकल असोसिएशनच्या मान्यताप्राप्त मेडिकल चालकाने उपस्थित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या यादीप्रमाणे गोळ्या देणे बंधनकारक आहे. मेडिकलमध्ये मान्यताप्राप्त पदवी घेतलेले कर्मचारी नियुक्त केले नाही.
चालक स्वतः उपस्थित राहत औषधे वितरण करण्यात येत आहे. हा गंभीर प्रकार असून यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. दोन महिन्यांपासून कोणताही भाडे करार न करता बेकायदेशीरपणे मेडिकल सुरू आहे.
यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्र अमृतराव सातव पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त परिमंडळ क्रमांक 3 व व लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोलीतील तक्रार केलेल्या मेडिकलबाबत चौकशीसाठी औषध निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.- के. जी. गादेवर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, परिमंडळ क्रमांक 3 पुणे.
मान्यताप्राप्त पदविका धारण केलेल्या कर्मचारी यांच्याकडून औषधांचे वितरण करण्यात येत आहे. जागेचा भाडेकरार केलेला नाही. 24 तास शीतपेये व इतर खाद्य पदार्थांची थोड्या प्रमाणात विक्री केली जात आहे.
– राहुल जाधव, मेडिकल चालक प्रतिनिधी