कोलोंबो – श्रीलंकेत सरकारविरोधा आदोलन करणारे आंदोलक आणि पोलिसांदरम्यान हिंसाचार झाल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारामुळे रामबुक्काना भागामध्ये पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू असेल, असे पोलिसांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी दुपारी रामबुक्काना भागात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला, तर अन्य 24 जण जखमी झाले होते. श्रीलंकेत पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढवण्यात आल्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन सुरू झाले होते. या हिंसक आंदोलनाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यामध्ये काही लोक जखमी आंदोलकांना आधार देऊन रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत.
पोलिसांकडून झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ एका पालीस ठाण्यावर आंदोलकांनी दगडफेक सुरू केली होती. त्यापूर्वी सलग 15 तास आंदोलन सुरू राहिल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला होता, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. सोमवारी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोलचे दर 84 रुपयांनी तर डिझेलचे दर 90 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.