सातारा, (प्रतिनिधी) – पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी सातारा जिल्हा प्रतिनिधी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष आणि जनता सहकारी बँकेचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मसापच्या 117 वर्षांच्या इतिहासात सातारा जिल्ह्याला हा बहुमान प्रथमच मिळाला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 28) पुणे येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, रवींद्र बेडकिहाळ,
अॅड. प्रमोद आडकर, शिरीष चिटणीस, पद्माकर कुलकर्णी, राजन लाखे, कल्याण शिंदे, अॅड. जे. जे. कुलकर्णी, तानसेन जगताप, वि. दा. पिंगळे, रावसाहेब पवार, पद्माकर शिरवाडकर, राजन मुटाणे, माधव राजगुरू, सुरेश देशपांडे, सतीश देसाई, जयंत येल्लूकर आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
विनोद कुलकर्णी यांनी 13 वर्षापूर्वी मसाप शाहुपुरी शाखेची स्थापना केल्यापासून मराठी भाषा दिन, सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा, लेखक तुमच्या भेटीला, मराठी वाङमय मंडळ, असे उपक्रम सुरू केले. एकदिवसीय साहित्य संमेलन, दोन विभागीय साहित्य संमेलने, युवा नाट्य संमेलनाचे आयोजन केले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठवण्याबरोबर नेत्यांच्या भेटीगाठी, पत्रव्यवहार, शाहूपुरी शाखेने पुढाकार घेऊन, दिल्लीत साहित्यिक आणि लोकप्रतिनिधींना घेऊन प्रार्थना आंदोलन केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध होण्यासाठी मसापच्या शाहूपुरी शाखेने दिलेला प्रस्ताव अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मंजुर झाला. कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचे स्मारकात रूपांतर केले आहे. जिल्ह्यातील साहित्यिकांचे पुतळे, स्मारकांची उभारणी लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात काम करण्याची संधी
मसापमध्ये काम करण्याची रवींद्र बेडकिहाळ यांच्यामुळे संधी मिळाली. त्यानंतर शाहुपुरी शाखेची स्थापना, सातारा जिल्हा प्रतिनिधी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ विश्वस्त, प्रतिनिधी या पदांवर टप्प्याटप्प्याने निवड झाली. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या प्रती ठेवलेल्या निष्ठेमुळे कोषाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. या पदामुळे महाराष्ट्रभर काम करण्याची संधी मिळणार आहे.- विनोद कुलकर्णी