पाचगणी -पाचगणी नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष निवडीत नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी बहुमतात गेलेल्या विरोधकांना आज धोबीपछाड करीत 9-9 अशा समान स्थितीत असताना विनोद वसंतराव बिरामणे यांच्या पारड्यात कास्टिंग व्होट टाकत दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपद बहाल केले.
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत पाचगणीकरांमध्ये उत्सुकता होती. या निवडीसाठी पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आज ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सभा घेण्यात आली. उपनगराध्यक्ष अनिल वन्ने यांनी 6 जुलै रोजी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. करोना संकटामुळे निवडीचा रेंगाळल्या होत्या.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी ही सभा बोलावण्यात आली होती. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत विनोद बिरामणे यांचे दोन अर्ज तर तर सौ. अपर्णा मिलिंद कासुर्डे यांचा एक अर्ज दाखल झाला. दोन अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीसाठी मतदान झाले. ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हात वर करून मतदान झाले. यामध्ये दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 9 मते मिळाली.
समान मते मिळाल्याने नगराध्यक्षांनी कास्टिंग व्होट अधिकार वापरून बिरामने यांच्या बाजूने हात वर केल्याने बिरामने एका मताने विजयी झाले आणि दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यावेळी उपस्थित होते.
यापूर्वी नगराध्यक्ष गटाकडे चार नगरसेवक होते आणि विरोधात 12 नगरसेवक होते. त्यामुळे यावेळीही उपनगराध्यक्षपद अध्यक्षांच्या विरोधी गटाकडे जाण्याची चिन्हे होती. परंतु, राजकारणात प्रत्येक वेळी चाणाक्षता दाखवणाऱ्या कऱ्हाडकर यांनी विरोधी गटाला धोबीपछाड करीत त्यांचे चार नगरसेवक आल्या बाजूला वळवत पुन्हा एकदा उपाध्यक्षपद आपल्याकडेच राखले. बिरामणे यांच्या निवडीने त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.