पिरंगुट -पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या वेतनाचा 65 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
मंडळाच्या सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनेही पाच लाख रुपये देण्यात आले. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सामाजिक बांधीलकीतून संस्थेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या मदतीचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही संस्था पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेली 79 वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी संस्थेच्या विविध शाखांमधून विविध प्रकारचे शिक्षण घेतात. संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतल्यानंतर अजित पवार यांनी ग्रामीण भागातील शाळा इमारतींचा कायापालट केला आहे. अध्यापनाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही विधायक उपक्रम राबविले. त्यामुळे संस्थेच्या सर्व शाळांचा दहावी, बारावीच्या गुणवत्तेचा आलेख दरवर्षी चढता असतो.
करोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, त्यामुळे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड. संदीप कदम, खजिनदार ऍड.बमोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम.जाधव यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आवाहन केले. कर्मचाऱ्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन संस्थेकडे जमा केले. या वेतनातून 65 लाख रुपये जमा झाले. संस्थेचे उपांग असलेल्या सेवक सहकारी पतसंस्थेनेही पाच लाख रुपये दिले असून, हे दोन्ही धनादेश अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मानद सचिव ऍड.संदीप कदम, संस्थेच्या नियामक मंडळाचे सभासद अजय कदम, पतसंस्थेचे अध्यक्ष महेंद्र अवघडे, सचिव रविंद्र लाड आदि उपस्थित होते.