औरंगाबाद: एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए- योनेक्स् सनराईज् 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटांत तेलंगणाच्या विनिथ मुत्यालने महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेचा तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या परी चव्हाणने तमिळनाडूच्या कुंदना भंडारूचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट, डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्ब्लेक्स् येथे पार पडलेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात तेलंगणाच्या विनिथ मुत्यालने महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेचा 6-3,4-6,6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या नवव्या मानांकित परी चव्हाणने तमिळनाडूच्या कुंदना भंडारूचा 6-2,1-6,6-3 असा पराभव केला. मुंबईची परी प्राक्टटेनिस अकादमी येथे प्रशिक्षक ऍलन मोसेस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक आशी पारितोषिके देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पश्चिम विभाग क्रीडा प्राधिकरणाचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एड्युरन्स्चे व्यवस्थापकीय संचालक संजय दत्ता, मनोज वैद्य, स्पर्धेच्या रेफ्री वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्राने पहिल्या दिवसापासून वर्चस्व राखले आहे. महाराष्ट्राच्या परी चव्हाणने आगामी वरिष्ठ स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.