पोल्ट्री चालकांचे आवाहन ः किरकोळ विक्रेते आकारतात चौपट दर
मंचर- करोना व्हायरसचा धसका घेत अनेकांनी मांसाहार वर्ज्य केला आहे; परंतु करोना व्हायरस आणि मांसाहाराचा कोणताही संबंध नसल्याने पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. बॉयलर कोंबड्यांचे खरेदीचे दर होलसेल व्यापारी पोल्ट्रीचालकांकडून 18 ते 25 रुपये किलोने घेत आहेत; परंतु किरकोळ विक्रेते चार पटीने म्हणजे 80 ते 100 रुपये दराने विक्री करत असल्याने ग्राहकांना चिकन घेणे परवडत नाही. किरकोळ विक्रेत्यांनी नफ्याची ज्यादा अपेक्षा ठेवू नये, असे आवाहन पोल्ट्री व्यावसायिक संघाने केले आहे. रिटेल विक्रेत्यांच्या सहयोगाने आता गावोगावी चिकन फेस्टिवल आयोजित करणे गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्यात पोल्ट्रीधारक शेतकरी सुमारे 2 हजार 430 आहेत. किरकोळ विक्रेते 80 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांना चिकन विकत आहे. सध्या ब्रॉयलर पक्ष्यांचे ठोक फार्म खरेदीचे दर (लिफ्टिंग रेट) 18 ते 25 रुपये प्रतिकिलोप्रमाणे आहेत. ठोक खरेदीच्या तुलनेत किरकोळ रेट दुप्पट असावेत, असा अलिखित नियम आहे. तथापि ठोक रेट 18 ते 25 रुपये प्रतिकिलो होऊन देखिल किरकोळ रेट 80 ते 100 रुपये म्हणजे चार पटींपेक्षा अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर घोडेगाव, कळंब, अवसरी इत्यादी भागांतील किरकोळ विक्रेते 80 रुपये किलो दराने चिकन विक्री करत आहे.
पोल्ट्रीधारकांनी विविध गावांनी जाऊन बोर्ड रेट कमी करण्याची विनंती रिटेल विक्रेत्यांना केली. फार्म रेट वाढल्यानंतर तुम्हीही किरकोळ रेट वाढवा, त्यास कुणाचीही हरकत नसणार आहे; पण जोपर्यंत फार्म रेट खाली आहेत,तोपर्यंत कोंबड्यांचा खप वेगाने होण्यासाठी किरकोळ रेट कमी करावेत, असे आवाहन राज्य पोल्ट्री व्यवसाय संघटनेचे सदस्य धनंजय ढुमणे, मनोज बेंडे पाटील यांनी केले.
शेतकरी व रिटेल विक्रेत्यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर सुसंवाद वाढतो. गैरसमज कमी होतात. एकमेकांच्या व्यवसायवृद्धीसाठी मदत मिळते. त्यात ग्राहकांसहीत सर्व घटकांचे हित साधले जाते.
– प्रकाश तापकीर, अध्यक्ष, राज्य पोल्ट्री संघटना
राज्यातील सर्व पोल्ट्री कंपन्या व पोल्ट्रीधारकांनी रिटेल विक्रेत्यांच्या भेटी घेऊन संवाद साधला, तर सध्याच्या उत्पादनवाढीची समस्या आठ दिवसांत सौम्य होईल. म्हणून आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच अन्यत्रही अशा प्रकारे रिटेलर्स समवेत भेटी-संवाद घडावेत.
शफीभाई मोमीन, आंबेगाव ऍग्रो