दुबई – आयपीएल स्पर्धेत यंदा सहभागी झालेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंवर विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी ताशेरे ओढले आहेत. इंग्लंडचे गोलंदाज त्यांच्याच देशाच्या फलंदाजांना उसळते तसेच यॉर्कर चेंडू टाकत नाहीत. त्यांचे फलंदाज त्यांच्याच देशाच्या गोलंदाजांवर आक्रमक फलंदाजी करत नाहीत, असा गंभीर आरोपही गावसकर यांनी केला आहे.
इंग्लंडचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार इयान मॉर्गन याला टॉम कुरेन व जोफ्रा आर्चर यांनी जाणूनबुजून फुलटॉस चेंडू टाकले. तसेच त्यांना वेगवान उसळते चेंडू तसेच यॉर्कर चेंडू टाकले नाहीत. कुरेनच्या ज्या उसळत्या चेंडूवर मॉर्गनने चौकार मारला तो अत्यंत धिम्यागतीने टाकण्यात आलेला उसळता चेंडू होता. हे गोलंदाज हीच कृती अन्य फलंदाजांबाबत मात्र करत नव्हते, असेही निरीक्षण गावसकर यांनी नोंदवले.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात थेट प्रक्षेपण सुरू असताना गावसकर यांनी आपले मत अत्यंत परखडपणे मांडले. त्यावरून सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाल्या. काही दिवसांपूर्वी गावसकर यांनी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर टीका करून वाद ओढवून घेतला होता. आता इंग्लंडच्या क्रिकेटपटूंवर केलेल्या टीकेमुळेही नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.