चिंचवडमध्ये घड्याळ पडले बंद

राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह पाच जणांचे अर्ज बाद

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघात शनिवारी अर्जाच्या छाननीच्या वेळी नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरलेले प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रशांत शितोळे यांच्याबरोबरच वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज भरलेले प्रकाश भाऊराव घोडके यांच्यासह पाच जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात कोण-कोण उतरणार याची चर्चा सुरु होती. भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप हे रिंगणात उतरणार असल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवाराची शोधा-शोध सुरु होती. अशा स्थितीत राष्ट्रवादीकडून मनपाचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांना उमेदवारी देण्याचे सांगण्यात आले. त्यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्जही भरला मात्र त्यांना “ए’ “बी’ फॉर्मच देण्यात आला नसल्याने आज झालेल्या छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद झाला आहे.

याबरोबरच वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केलेले प्रकाश भाऊराव घोडके यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना दहा प्रस्तावकच्या ऐवजी नऊ प्रस्तावकांच्याच स्वाक्षऱ्या घेतल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. त्याचबरोबरच भारतीय जनता पार्टीकडून शंकर पांडुरंग जगताप यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या अर्जाबरोबरही पक्षाचा अधिकृत “ए’ “बी’ फॉर्म नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. बहुजन समाज पार्टीकडून विजय निवृत्ती वाघमारे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनाही पक्षाने “ए’ “बी’ फॉर्म दिलेला नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. तसेच जनता पक्षाकडून अर्ज दाखल केलेले राजकुमार घनशाम परदेशी यांचाही अर्जही छाननीमध्ये बाद झाला आहे. या पाच उमेदवारांचे अर्ज आज झालेल्या छाननीमध्ये लोकप्रतिनिधित्व अधिनियम 33 नुसार अवैध ठरविण्यात आले आहेत.

त्यामुळे, आता चिंचवड विधानसभेच्या आखाड्यात 14 उमेदवार राहिले आहेत. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आपले अर्ज 7 ऑक्‍टोबर पर्यंत माघारी घेता येणार आहेत. 7 ऑक्‍टोबर पर्यंत कोण-कोण उमेदवारी अर्ज माघे घेणार यानंतरच चिंचवडच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.