नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री सपना गिल यांच्यामध्ये झालेल्या कथित झटापटीची चर्चेने देशात एकच खळबळ उडाली होती. पृथ्वी शॉ व सपना गिलमध्ये मुंबईतल्या एका नाईट क्लबबाहेर सेल्फी काढण्यावरून वाद झाले होते. यावेळी सुरुवातीला पृथ्वी शॉने सपना गिलविरोधात गैरव्यवहाराची तक्रार केली होती. त्यावेळी सपना गिलला अटकही झाली होती. मात्र आता सपना गिलने पृथ्वी शॉविरोधात केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
सपना गिलने पृथ्वी शॉविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, सपनाने थेट विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पृथ्वी शॉविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका संकेतस्थळाने म्हटले आहे.
Hustle video of #Cricketer #Prithvishaw & #influencer #Sapnagill outside Barrel mansion club in vile parle east #Mumbai, it is said that related to click photo with cricketer later whole fight started. @PrithviShaw @MumbaiPolice @DevenBhartiIPS @CPMumbaiPolice @BCCI pic.twitter.com/6LIpiWGkKg
— Mohsin shaikh 🇮🇳 (@mohsinofficail) February 16, 2023
या वृत्तानुसार सपना गिलने आपल्या तक्रारीत पृथ्वी शॉने विनयभंग केल्याचे म्हटले आहे. जीवघेण्या हत्याराने आपल्यावर हल्ला केल्याचेही सपना गिलने म्हटले आहे. त्यासोबतच पृथ्वी शॉने आपल्या छातीला हात लावून आपल्याला दूर लोटल्याचे सपनाने आपल्या तक्रारीत म्हटलेआहे. दरम्यान, यासंदर्भात आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाणार? सपना गिलप्रमाणेच पृथ्वी शॉवरही अटकेची कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा सगळा प्रकार मुंबईतल्या विले पार्ले पूर्वमध्ये असणाऱ्या बॅरेल मॅन्शन क्लबबाहेर घडला होता. सपना गिल आणि तिच्या काही मैत्रिणी पृथ्वी शॉबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यात बाचाबाची आणि पुढे धक्काबुक्की झाली. सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी आपल्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप नंतर पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राने केला. त्यांनी याची रीतसर तक्रारही दाखल केली. या तक्रारीनंतर सपना गिलविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. चार दिवसांनंतर सपना गिलला जामीन मंजूर झाला. मात्र, आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत येण्याची शक्यता आहे.