श्रीनगर- पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी अड्डयांवर भारतीय लष्कराने कारवाई करण्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये गोळीबाराचा जोरदार आवाज आणि धुरामध्ये जोरदार धुमश्चक्रीमुळे अड्डयांमधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. भारतीय लष्कराने शुक्रवारी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जोरदार कारवाई करून दहशतवादी अड्डयांना उद्ध्वस्त केले होते. सीमेवरील शस्त्रसंधीच्या भंगाला प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती.
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये दुधनियाल भागातील एका इमारतीचे अंशतः नुकसान झाले आहे. तर अथमोगन आणि शाहकोट भागातील एका दुकानाचेही अंशतः नुकसान झाले आहे. नीलम खोऱ्यामध्ये अथमुगन, दुधनियाल, शार्डी, तेजियान आणि केल भागामध्ये दहशतवादी यायला लागले असल्याच्या गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे लष्कराने ही कारवाई केली आहे.
भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 1 एप्रिल आणि 5 एप्रिलला तीन बैहक भागात आणि केरन भागात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर चकमक झाली होती. दुधनियाल भागात आणि जवळपासच्या भागातही दहशतवाद्यांचा वावर बघितला गेला होता. भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि भविष्यात घुसखोरी होऊ नये म्हणून भारतीय लष्कराला या अड्डयांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलावे लागले होते.
घुसखोरीच्या दरम्यान पाकिस्तानी सैन्यानेही बुर्झवान, डोमेल मोर पोझिशन भागात सीमेपलिकडून गोळीबार आणि मोर्टारचा मारा केला होता. त्या गोळीबाराला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तरही दिले होते. या गोळीबारात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.