थेऊर (वार्ताहर) – येथील तत्कालीन मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्या कार्यालयातील दोन खासगी व्यक्तिंना 7 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 13 मार्चला रंगेहाथ पकडले होते. ही घटना ताजी असतानाच, आता जमिनीच्या सातबारा उतार्यावर फेरफार नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी यांच्यासाठी 80 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पूर्वीच्या लाचेच्या प्रकरणातील एका आरोपीवर दुसर्यांदा लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे हवेली महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
विजय सुदाम नाईकनवरे (रा. नागपूर चाळ, येरवडा, पुणे) असे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या खासगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी एका 65 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी कोलवडी (ता. हवेली) येथे जमीन खरेदी केली होती.
त्या जमीनीची सात बारा उता-याची नोंद व फेरफार मंजुर करण्यासाठी थेऊर येथील तत्कालीन मंडल अधिकारी यांच्याकरीता खाजगी इसम विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे थेऊर मंडल अधिकारी यांच्याकरीता 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यामुळे विजय नाईकनवरे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 20 दिवसाच्या आत दुसरा लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाबलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.