रुग्णांना डाएटनुसार पाच वेळा जेवण; बाऊन्सर्स हटवले
सीसीटीव्हीद्वारे स्वच्छता आणि अन्य घडामोडींवर लक्ष
पुणे – जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांशी आता नातेवाईकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलता येणार आहे. याशिवाय रुग्णांवर आणि तेथील घडामोडींवर सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. आता तेथील रुग्ण बरे होऊन जाण्याला सुरुवात झाली आहे. येथील यंत्रणेबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी खुलासा केला.
“पालिकेने येथे 50 डॉक्टर्स आणि दीडशे वैद्यकीय मनुष्यबळ तैनात केले आहे. त्यानंतर रविवारी रात्री पहिला करोना बाधित रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तसेच सोमवारी सकाळी आयसीयूमधील दोन अत्यवस्थ रुग्णांवरील धोका टळला असून, त्यांना आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. पुढील दोन-तीन दिवसांत हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीत सुधारणा दिसेल,’ असे अग्रवाल म्हणाल्या.
“आम्ही या ठिकाणच्या छोट्या विषयांवर लक्ष ठेवून आहे. जेवणाबाबत काही जणांची तक्रार होती. आधी जेवण तीन वेळा दिले जात होते ते आता पाच वेळा दिले जाणार आहे. तसेच हे जेवण रुग्णांच्या डाएटनुसार दिले जाणार आहे. येथील स्वच्छतेबाबतही तक्रारी आल्या होत्या. त्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. सीसीटीव्ही मार्फत आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता नीट झाली आहे की नाही हे तपासणार आहे.
याशिवाय ते वेळेत झाले आहे का, कर्मचारी पुरेसे उपस्थित आहेत का, हे सगळे रोज तपासले जाणार आहे. येथील बाऊन्सर्सविषयीही अनेकांनी तक्रार केली होती. तेथे आता महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, डॉक्टरांची सुरक्षा ही दुसरी बाजूही महत्त्वाची आहे. तेथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी संयम बाळगला पाहिजे. विलगीकरण कक्षात परवानगीविना नातेवाईकांनी थेट जाऊ नये. अन्यथा सक्ती बाळगावी लागेल,’ असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
‘पेशंट रिलेटिव्ह टॅब’ उपक्रम आजपासून
“पेशंट रिलेटिव्ह टॅब’ हा उपक्रम मंगळवारपासून सुरू करणार आहे. या उपक्रमांतर्गत रुग्ण आणि नातेवाईक यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार आहे. आम्ही तेथे दोन टॅब ठेवले आहेत. एक टॅब रेसेप्शनवर डॉक्टरांकडे राहणार आहे, तर दुसरा हेल्पडेस्कला राहणार आहे. कोणी नातेवाईक हेल्पडेस्कला रुग्णांच्या चौकशीसाठी आले तर त्यांना रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे करून दिले जाणार आहे. शिवाय त्यांची केलेली व्यवस्थाही दाखवली जाईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. हेल्प डेस्कसाठी माउन्टेरिंग असोसिएशनच्या मदतीने सुमारे 40 जण समुपदेशन करणार आहेत.