नारा : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. निवडणुकीपूर्वीच्या एका सभेमध्ये ते भाषण करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आबे यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे.
पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावरील या सभेमध्ये आबे यांचे भाषण सुरु असतानाच मागून हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आबे यांच्यावरील हल्ला स्पष्टपणे दिसत आहे.
This was the moment Shinzo Abe was assassinated. pic.twitter.com/vBpzy6LBE0
— Ian Miles Cheong (@stillgray) July 8, 2022
गोळ्या झाडल्यानंतर आबे जमिनीवर कोसळल्याचेही दिसत आहे. हल्लेखोराने आबे यांना पाठीमागून लक्ष्य केले. त्यामुळे या हल्ल्यात काही समजायच्या आतच आबे यांना दोन गोळ्या लागल्या. आबेंवर हल्ला झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. हा सर्व घटनाक्रम या व्हिडीओमध्ये कैद करण्यात आला आहे.
शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरचे नाव यामागामी तेत्सुआ असल्याचे समोर आले आहे. तो जपानमधील नौसेना म्हणजेच जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्सचा माजी सदस्य आहे. तेत्सुआने जपानमधील एका स्थानिक विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात पहिली गोळी आबे यांच्या छातीवर तर दुसरी गोळी मानेला लागली असून आबे यांचा मृत्यू झाला. सध्या आरोपी तेत्सुआ याला जपानी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.