#ENGvIND 4th Test : ऐतिहासिक विजयासह भारताची आघाडी

इंग्लंडवर 157 धावांनी मात; मालिका केली सुरक्षित

लंडन – भारतीय संघाने ओव्हल मैदानावर यजमान इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. भारताने या चौथ्या कसोटीतील विजयासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी सुरक्षित आघाडी घेतली.

भारतीय संघाने विजयासाठी दिलेले 368 धावा करण्याचे आव्हान इंग्लंडला पेलवलेच नाही व त्यांचा डाव 93 व्या षटकांत 210 धावांवर संपुष्टात आला. रविवारच्या बिनबाद 77 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर इंग्लंडच्या सलामीवीर फलंदाजांनी संयमी परंतु आश्‍वासक खेळी केली. रोरी बर्न व हसीब हमीद या जोडीने शतकी सलामी दिली. यावेळी कर्णधार विराट कोहलीने चेंडू शार्दुल ठाकूरच्या हाती सोपवला. त्याच्या गोलंदाजीवर बर्न बाद झाला व भारताला पहिला बळी मिळाला. बर्नने 125 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक फटकावले.

त्याचवेळी स्थिरावलेला अर्धशतकवीर हमीदही बाद होता होता वाचला. त्याने फटकावलेला चेंडू महंमद सिराजला झेलता आला नाही. हा अत्यंत सोपा झेल सोडल्यामुळे भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, डेव्हिड मलान धावबाद झाल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाला विजयाची संधी दिसली. पाठोपाठ हमीदही रवींद्र जडेजाचा बळी ठरला. त्याने 193 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार ज्यो रूट खेळपट्टीवर आला व त्याने धिरोदत्तपणे खेळ केला. तो सेट झाला असे वाटत असतानाच ठाकूरनेच त्याचा त्रिफळा उडवला व भारताचा विजय दृष्टीपथात आणला.

रूटने 78 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. त्यानंतर मात्र, भारतीय संघाने संपूर्ण सामन्यावर नियंत्रण राखले. ओली पोप, जॉनी बेअरस्टो व मोईन अली हे भरवशाचे फलंदाज अपयशी ठरले. तळात ख्रिस वोक्‍स, क्रेग ओव्हरटन व ओली रॉबिन्सन यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र, उमेश यादवने वोक्‍स आणि ओव्हरटनला बाद करत भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर यादवने जेम्स अँडरसनला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. या विजयासह भारतीय संघाने पाच कसोटींच्या या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत ही मालिका सुरक्षित केली आहे. मालिकेतील नॉटिंगहॅम येथील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्यानंतर भारताने लॉर्डसवर तर, इंग्लंडने हेडिंग्लेवर विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली होती. या सामन्यात विजय मिळवल्यामुळे आता पाचवा सामना गमावला तरीही भारतीय संघ ही मालिका गमावणार नसल्याचे स्पष्ट झाले.

यॉर्करकिंगचे बळींचे शतक

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शंभर कसोटी बळींचा आकडा पार केला. त्याने इंग्लंडच्या ओली पोपला बाद करत ही कामगिरी केली. त्यानंतर बुमराहने या मालिकेतील सर्वात वेगवान चेंडू टाकताना ताशी 143 किमी वेगाने त्याचा स्पेशल यॉर्कर चेंडू टाकत इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा उडवला.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव – 191. इंग्लंड पहिला डाव – 290. भारत दुसरा डाव – 466. इंग्लंड दुसरा डाव – 92.2 षटकांत सर्वबाद 210 धावा. (हसीब हमीद 63, रोरी बर्न 50, ज्यो रूट 36, ख्रिस वोक्‍स 18, क्रेग ओव्हरटन 10, ओली रॉबिन्सन नाबाद 10, उमेश यादव 3-60, शार्दुल ठाकूर 2-22, जसप्रीत बुमराह 2-27, रवींद्र जडेजा 2-50).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.