शिमला – कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ आणि माजी केंद्रीय मंत्री आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे आज दीर्घ आजारामुळे निधन झाले. नुकतीच त्यांनी करोनाच्या आजारालाही दोन वेळा मात दिली होती. सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते जिथे आज त्यांचा मृत्यू झाला. ते 87 वर्षांचे होते.
वीरभद्र सिंह यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते आणि त्यांची तब्येत स्थिर होती. वीरभद्र सिंह हे 6 वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि पाचवेळा लोकसभेवर खासदार म्हणूनही निवडून गेले होते. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमध्येही मंत्री म्हणून काम पाहिले. इतकेच नाही, तर ते 9 वेळा राज्य विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते.
याआधी त्यांना एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाली होती आणि या आजारातून ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले होते. यानंतर 11 जून रोजी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला ज्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती केले गेले. त्यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या सोलन जिल्ह्याच्या अरकी येथून विद्यमान आमदार असलेल्या वीरभद्र सिंग यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.