सांगली – सांगली शहरातील 100 फुटी रोड परिसरात नवीन वर्षाची सुरुवात तोडफोड, जाळपोळीने झाली. चारचाकी वाहने पेटवून, तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार या परिसरात घडला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी वाहनांची जाळपोळ करत तोडफोड केल्याची घटना घडली आहे. 4 ते 5 जणांच्या टोळक्याने 100 फुटी रोडवर असणाऱ्या गाड्यांवर अचानक हल्ला चढवला. या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहेत. याठिकाणी उभी असलेली एक स्कॉर्पिओ आणि एक मारुती कार अज्ञातांनी पेटवून दिली. दोन्ही वाहने जाळून खाक झाले आहेत. तर या रोडवर असणाऱ्या इतर चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
गाड्यांच्या कांचांवर मोठमोठे दगड फेकून तोडफोड करण्यात आली आहे. सुमारे 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या दरम्यान मनसेचे कार्यकर्ते आशिष कोरी या मार्गावरुन जात असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्या व अन्य एका कुटुंबांच्या गाडीवरही दगडफेक केली. यानंतर कोरी यांनी या रस्त्यावर असणाऱ्या एका पोलीस मदत केंद्रात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन पथकालाही पाचारण केले. त्यानंतर पेट घेतलेल्या गाड्यांची आग विझवण्यात आली.
पोलिसांनी तातडीने याठिकाणी असणाऱ्या काही सीसीटीव्हींची पाहणी केली. चार जण गाड्यांची तोडफोड करत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात दारुच्या नशेत हे कृत केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.