नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसने मंगळवारी आणखी सहा समित्यांची स्थापना केली. त्यानुसार माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांना प्रचार समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
नव्या वर्षात जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या प्रारंभी दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून समित्या स्थापण्याच्या प्रक्रियेकडे पाहिले जात आहे.
त्या प्रक्रियेत लोकसभा निवडणुकीआधी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या आझाद यांना महत्व देण्यात आले आहे. त्यांच्याकडे 165 सदस्यीय प्रचार समितीची धुरा सोपवण्यात आली आहे. दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा हे निवडणूक समितीचे नेतृत्व सांभाळतील.
अजय माकन, जे.पी.आगरवाल, अरविंदरसिंग लवली आणि मुकेश शर्मा यांच्याकडे अनुक्रमे जाहीरनामा, प्रसिद्धी, निवडणूक व्यवस्थापन आणि माध्यम समन्वय समित्यांचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. मागील आठवड्यात कॉंग्रेसने दिल्लीतील उमेदवारांची निवड करण्यासाठी छाननी समिती स्थापन केली.
त्या समितीचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील तरूण नेते राजीव सातव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दिल्ली काबीज करण्यासाठी सत्तारूढ आप, भाजप आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.