शिक्रापूर पोलिसांकडून दररोज केली जातेय 30 ते 35 वाहनांवर कारवाई
शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असताना आता पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना जामर लावत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
शिक्रापूर येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र मदने, ट्रॅफिक वार्डन किरण थोरात, अमोल राऊत, नारायण थोरात यांसह आदी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत रस्त्यामध्ये बेकायदेशीरपणे पार्किंग करण्यात येणारी वाहने, विरुद्ध दिशेला लावलेली वाहने यांना जॅमर लावून दर वाहनांवर कारवाई करत असून दररोज सुमारे तीस ते पस्तीस वाहनांवर पोलीस कारवाई करत आहे. त्यामुळे शिक्रापूर येथे रस्त्याच्याकडेला लावली जाणाऱ्या वाहनचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. रस्त्याच्या कडेला कोणीही वाहने लावत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली आहे, तर वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी अशा पद्धतीची कारवाई दररोज सुरूच ठेवणार असल्याचे पोलीस स्टेशनचे वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले आहे.
- वाहतूक कोंडीची चर्चा सर्वत्र
शिक्रापूर ता. शिरूर येथील चाकण चौकात दररोज होणारी वाहतूककोंडी सर्वत्र गाजली आहे. तर अनेकदा शिक्रापूरातील वाहतूककोंडी अनेकदा विधानसभेमध्ये देखील गाजली आहे. पुणे ग्रामीण वाहतूक विभागाच्या पोलीस पथकाला देखील शिक्रापूर येथे येवून वाहतूककोंडी वर उपाययोजना करावी लागली आहे. तसेच शिक्रापूर पोलीस देखील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरलेले असतात अनेकदा शिक्रापूर पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे.