काटेवाडी, कन्हेरीत नागरिकांमध्ये जनजागृती
भवानीनगर- बारामती तालुक्यातील काटेवाडी व कन्हेरी भागात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे वैभव भालेराव यांनी जनजागृती केली.
सहायक वनसंरक्षक पुणे वैभव भालेराव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कन्हेरी, काटेवाडी भागात भेट देऊन पाहणी केली. यावेळी वनविभागाचे सहायक वनरक्षक पुणे वैभव भालेराव, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे व सहकाऱ्यांनी ग्रामस्थांना सजग केले. भालेराव म्हणाले की, बिबट्या हा निशाचर प्राणी असल्याने तो इतर प्राण्यांची शिकार करूनच आपली उपजीविका भागवतो. साधारण बिबट्या हा त्याच्या उंची एवढ्या सावजाचीच शिकार करताना आतापर्यंत पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे. यात कुत्रा आणि रान डुक्कर, इतरही जंगली प्राण्यांची शिकार करतो. बिबट्या हा प्राण्यांच्या गळ्याचा चावा घेऊन साधारण शंभर किलोपर्यंत वजन असलेला प्राणीही तो सहजरित्या झाडावर नेवू शकतो. इतकी ताकत त्याच्यामध्ये असते.
बिबट्या भागात आल्याने सकाळ व संध्याकाळी शाळेतून मुलांना घरी आणण्याचे काम ग्रामस्थांनी केले पाहिजे. शेतामध्ये जाताना काठीला घुंगरू बांधावे आणि हातात मोठी टॉर्च (बॅटरी) असावी. साधारण तीन ते चार जणांनी जमावाने शेतात जाणे योग्य आहे. ज्या भागात बिबट्याचा वावर होत असल्याचा अंदाज आहे. त्या त्या भागात सध्या ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत. बिबट्या हा प्राणी एका दिवसात 10 ते 15 किलोमीटरचे अंतर पार करू शकतो. त्यामुळे त्याचा वावर नक्की कुठे आहे, हे आपल्याला सांगता येत नाही. बिबट्या व पिलाबाबत माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भालेराव यांनी दिली.