Vasant More on Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मोरे हे सध्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुणे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. मनसे पक्षामध्ये असताना राज ठाकरे यांचे कडवे समर्थक अशी वसंत मोरे यांची ओळख होती. पक्षातील अंतर्गत गटबाजीबाबत वसंत मोरे यांनी अनेकदा जाहीर भूमिका देखील घेतली होती.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अशातच आज मोरे यांना राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाबाबत तसेच त्यांच्या मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या निर्णयाबाबत विचारण्यात आले.
राज ठाकरेंची सभा मिस केली का? | Vasant More on Raj Thackeray
पुण्यामध्ये पत्रकारांनी मोरे यांना राज ठाकरे यांची सभा मिस केली का? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना त्यांनी, राज ठाकरे यांची सभा मिस केल्याची प्रांजळ कबुली दिली. मात्र आपल्याला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपण इतर सर्व पक्षांचा विचार सोडून दिला असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
“वंचित आघाडीकडनं मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी इतर सगळ्या पक्षांचा विचार सोडून मी फक्त वंचित बहुजन आघाडी याच एकमेव पक्षाचा विचार करतोय आणि या पुणे शहरामध्ये निवडून येण्यासाठी मी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पातळ्यांवरती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय” असे वसंत मोरे यांनी सांगितले
राज ठाकरेंची सभा पाहिली का? | Vasant More on Raj Thackeray
“बारा तारखेनंतर म्हणजेच पक्ष सोडल्यानंतर मी माझ्या विचाराशी ठाम राहिलेलो आहे. त्यामुळं मला वाटतंय की, आता वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून पाच तारखेपासून पूर्णपणे प्रचार यंत्रणेमध्ये आहे. कालसुद्धा मी प्रचार यंत्रणेमध्ये होतो. आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा मी सभेचे थोडेफार लाईव्ह टेलिकास्ट पाहिले” असेही वसंत मोरे यांनी सांगितले.
View this post on Instagram
मोदींना पाठिंबा देण्याची राज ठाकरेंची भूमिका, मोरे म्हणतात…
यावेळी पत्रकारांनी, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेबाबत वसंत मोरे यांना विचारले. यावर बोलताना मोरे यांनी, आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही हे पुणेकर निवडणूक निकालामधून समोर येईल असेही मोरे म्हणाले.
गुढीपाडवा मेळावा
दरम्यान, राज ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. राज ठाकरे यांच्या भूमिकेचे महायुतीकडून स्वागत करण्यात आले आहे. तर विरोधी महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.