Navneet Rana | नवनीत राणांच्या मदतीला ‘या’ बड्या नेत्यांची फौज सज्ज, स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Navneet Rana | Lok Sabha Election 2024 : युवा स्वाभिमानचा राजीनामा देत खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे अर्ज दाखल करणे सुरू होणार, तत्पूर्वी त्यांनी दि. २७ मार्च रात्री नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला त्यांचे पती तसेच युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष व आमदार रवी राणा यांची उपस्थिती होती.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. सध्या त्यांनी आपला प्रचार देखील सुरु केला असून, नवनीत राणा यांच्या मदतीला भाजपच्या जुन्या, जाणत्या व अनुभवी नेत्यांची फौज सज्ज केली असल्याचं दिसून येत आहे. । Navneet Rana | Lok Sabha Election 2024
यंदाची अमरावती लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने चांगलीच गांभीर्याने घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमरावती जिल्ह्याचे राजकीय गणित व परिस्थिती बघता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांच्या मदतीला अनेक अनुभवी नेते उभे केले आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या मतदारसंघांमध्ये एकूण तब्बल १२ वक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बडनेरा मतदार संघातील सभांना स्टार प्रचारक शिवराय कुलकर्णी व किरण पातुरकर, अमरावतीसाठी जयंत डेहनकर आणि आमदार प्रवीण पोटे. । Navneet Rana | Lok Sabha Election 2024
दिवसा मतदारसंघाकरिता निवेदिता चौधरी व राजेश वानखडे, दर्यापूर मतदारसंघाकरिता माजी आमदार रमेश बुंदेले व गोपालचंदन, मेळघाटकरिता प्रभुदास भिलावेकर व बादल कुलकर्णी तर दिनेश सूर्यवंशी व प्रवीण तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
“नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार”; बच्चू कडू यांची भूमिका
“आमचा विरोध कायम आहे. आम्ही कायम विरोध करु. आम्ही केल्या तक्रारीचा काही उपयोग झाला नाही. आम्ही आता बघू, एकंदरीत काय रणनीती आहे त्यापद्धतीने उमेदवार द्यायचा का, याबाबत निर्णय घेऊ. आम्ही नवनीत राणा यांचा शंभर टक्के प्रचार करणार नाहीत.
नवनीत राणा यांच्यासाठी ही लढत तेवढी सोपी राहणार नाही. याचा रिझल्ट नक्कीच दिसेल. आम्ही नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. “आम्ही आता विरोधात प्रचार करुन त्यांना महायुतीत ठेवायचं किंवा न ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे”, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
‘राजकारण सोडेन पण नवनीत राणाचा प्रचार करणार नाही’ – आनंदराव अडसूळ
“खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वाट्टेल ते बोलण्याची सवय आहे. जे होणार आहे, तेच आम्ही बोलतो. अमरावती लोकसभा मतदार संघातून कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असून एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी दिलीय.





