शांत परिसर, जलपर्णी विरहित तलाव, स्वच्छ पाण्याकडे होत आहेत आकर्षित
पुणे – शांत परिसर, जलपर्णी विरहित तलाव, स्वच्छ पाणी आणि या पाण्यात तसेच तळ्याकाठी मुक्तपणे बागडणारे पक्षी असे निसर्गरम्य दृश्य अलीकडे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे दृष्य पुण्याबाहेरील एखाद्या ठिकाणाचे नसून, शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मॉडेल कॉलनी परिसरातील आहे. परिसरातील लकाकी तलाव हे विविध प्रकारच्या पक्ष्यांनी गजबजले असून, याठिकाणी जैवविविधता बहरत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे शहरातील बहुतांश तलावांना प्रदूषित पाणी, जलपर्णी यांचे ग्रहण लागलेले असताना, लकाकी तलाव मात्र यासाठी अपवाद ठरत आहे. तलावात सध्या जलपर्णीचे अस्तित्वही दिसून येत नाही. तसेच, विविध प्रकारचे पक्षी येथे आनंदाने बागडताना दिसतात.
याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे म्हणाले, “चार ते पाच वर्षांपूर्वी लकाकी तलावाचे डिफिल्टरिंग केले होते. यांतर्गत तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे तलावाला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणारे स्रोत पुनरूज्जिवित झाले आहेत. तलावाला स्वच्छ पाणी उपलब्ध होत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
तसेच, तलावात गाळापासून कृत्रिम बेट उभारून याठिकाणी पाणगवताची लागवड करण्यात आली आहेत. त्यामुळे पक्ष्यांना बिनधास्तपणे याठिकाणी घरटी बांधून अंडी घालता येतात. या व्यतिरिक्त तलावाच्या आसपासच्या प्रदेशातही पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली असून, तलावात वाढणारी जलपर्णी अथवा इतर हानिकारक गोष्टी तातडीने काढल्या जाव्यात यासाठी सुसज्ज होड्या आणि कर्मचारीदेखील नियुक्त केले आहेत. अशा विविध उपाययोजनांमुळे लकाकी तलावाची जैवविविधता पुनरूज्जिवित होण्यासाठी मोलाची मदत मिळाली आहे. त्यामुळेच सध्या तलावात विविध पक्ष्यांची लगबग दिसते.’