पुणे: गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात वैष्णवी आडकरने मानांकित खेळाडूवर मात करत खळबळजनक विजय मिळविला. मुलांच्या उदित गोगोई, चिराग दुहान यांनी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात भारताच्या चिराग दुहन याने उदयवीर सिंगचा 6-3, 6-7(3), 6-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. हरयाणाच्या उदित गोगोई याने रोमानियाच्या ड्रॅगोस पेट्री पोपेंगाचा 6-1, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या व वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवी आडकर हिने तैपेयीची अव्वल खेळाडू युयुन ली हिला कडवी झुंज देत 6-2, 4-6, 7-6(5) असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
चीनच्या जिऑन झुई हिने क्वालिफायर रेश्मा मारूरीचे आव्हान 7-5, 6-3 असे संपुष्टात आणले. स्पर्धेचे उद्घाटन विलास जावडेकर, डॉ.जयदीप दाते, डेक्कन जिमखानाचे जनरल सेक्रेटरी विश्वास लोकरे आणि एमएसएलटीएचे आजिव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, प्रमोद बाकरे, पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, समीर केंकरे, नितीन रानडे, प्रीतम गोयल, सुशील पाटील आदी उपस्थित होते.