पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत असलेला करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील 539 पैकी 300 उपकेंद्रांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच हे केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग मिळेल.
पुणे जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 539 उपकेंद्रे आहेत. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 23 कोविड केअर सेंटर आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमध्ये आणि ग्रामीण भागात एकूण 330 लसीकरण केंद्रे आहेत.
त्यामध्ये 224 सरकारी, खासगी रुग्णालयात 106 ठिकाणी लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात 125 प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे. तसेच 35 खासगी रुग्णालयांमध्ये हे केंद्रे आहेत. आता आणखी लसीकरण केंद्रे वाढविण्याचा विचार जिल्हा परिषदेने प्रशासनाने सुरू केला आहे.
पुणे जिल्ह्यात सद्य:स्थितीत 539 उपकेंद्रे असून त्यापैकी 450 ठिकाणी डॉक्टर कार्यरत आहेत. तर, 100 केंद्रांवर सीएचओ (चिफ हेल्थ ऑफिसर) नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 300 ठिकाणच्या उपकेंद्रांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. लसीकरण वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे