नवी दिल्ली – देशात करोना लसीकरण मोहिम मोठया प्रमाणात राबविण्यात येत असून या महिन्यात राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना दिले आहेत.
या महिन्यात प्रत्येक राज्याला ठराविक लसीचा ठराविक पुरवठा करण्यात येईल. याशिवाय 2 कोटींपेक्षा अधिक डोस जास्तीचे पुरवण्यात येणार आहेत. 5 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करण्याचा प्रयत्न करा, असे मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च 2020मध्ये देशव्यापी लॉकडाउन लावण्यात आले होते. त्याच्या काही दिवस आधीपासूनच देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती.
अनेक राज्यांनी शाळा अंशतः पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली असतानाच एप्रिल महिन्यात करोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे शाळा पुन्हा पुर्णपणे बंद करण्यात आल्या. गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून शाळा-महाविद्यालये ऑनलाइन सुरू आहेत.
देशातील करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांनी शाळा पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू होत असल्या तरी लसीअभावी अनेक शिक्षकांचे लसीकरण रखडले आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.