लंडन – पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने आघाडी घेतली. पहिला सामना अनिर्णित राहिला तर दुसरा सामना भारताने जिंकला. या दोन्ही सामन्यांत भारतीय संघाने वर्चस्व राखले.
भारताच्या गोलंदाजीच्या ताफ्यात महंमद सिराज याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती पाहता इंग्लंडला त्याची गोलंदाजी खेळणे जड जात असल्याचेच स्पष्ट होत आहे. सिराजच्या गोलंदाजीसाठी इंग्लंडला काहीतरी उत्तर शोधावे लागणार आहे, असे मत इंग्लंडचा माजी कसोटीपटू मॉंटी पानेसर याने व्यक्त केले आहे.
भारताने दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडवर वर्चस्व राखले आहे. पण या दोन्ही सामन्यांत भारताच्या सिराजने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि तो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड ठरत आहे, असेही पानेसर म्हणाला.
दोन्ही सामन्यांमध्ये सिराजने लक्ष वेधून घेतले आहे आणि त्याची गोलंदाजी इंग्लंडच्या खेळाडूंना जमतच नसल्याचे पाहायला मिळत आहे. सिराज हा भारतीय संघासाठी सध्याच्या घडीला ट्रम्पकार्ड ठरत आहे. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांना बाद केले आहे.
त्याच्या गोलंदाजीमध्ये चांगला वेग आहे आणि सिराजच्या गोलंदाजीचा अभ्यास अजूनपर्यंत इंग्लंडच्या फलंदाजांना करता आलेला नाही. त्यामुळेच त्याच्या गोलंदाजीवर त्यांना जास्त धावा करता येत नाहीत. जर सिराजने सातत्यपूर्ण कामगिरी केली, तर तो या मालिकेत भारतासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू ठरू शकतो, असेही पानेसर याने म्हटले आहे.