वॉशिग्टन, दि. 6- अमेरिकेतील 12 वर्षांवरील बालकांना फायझरची लस देण्यास अन्न आणि औषधं प्रशासनाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची मान्यता याच आठवड्यात मिळण्याची शक्यता असून पुढच्या आठवड्यापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना करोनाची लस देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अमेरिकेतल्या 16 वर्षांवरील सर्वांना फायझरची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे. कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता या लसीच्या वापराला या आठवड्यातच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10.5 कोटी नागरिकांचे पुर्णपणे लसीकरण झाले असून 14.7 कोटी लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.
करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले अमेरिकेतील नागरिक आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. या नागरिकांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने गेल्या आठवड्यात हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याआधी करोनामुक्त झालेल्या इस्रायलने देखील अशाच प्रकारचे पाऊल उचलले होते. तिथेही काही नियमांसह विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. इस्रायलमधील सुमारे 60 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे.