विजय लाड
कोयनानगर – गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसाने कोयना परिसराचे निसर्गसौंदर्य खुलले आहे. पावसाळ्यात ओसंडून वाहणारा, परंतु यंदा ऐन पावसाळ्यात तब्बल एक महिना पर्यटनबंदीमुळे कोमेजलेला ओझर्डे धबधबा पर्यटकांसाठी दोन महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू झाला. त्यानंतर आतापर्यंत या धबधब्यास नऊ हजार 455 पर्यटकांनी भेट देऊन, निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. पर्यटकांमुळे नऊ लाख 43 हजार 600 रुपयांचा महसूल वन्यजीव विभागाने गोळा केला आहे.
“ऑल टाइम एव्हरग्रीन’ असलेला ओझर्डे धबधबा पर्यटनपंढरी बनत असलेल्या कोयना भागातील “माइलस्टोन’ ठरत आहे. मुसळधार पाऊस पडणाऱ्या कोयना परिसरातील निसर्गसौंदर्य बहरते. पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सह्याद्रीच्या कुशीतील नवजा येथील ओझर्डे धबधबा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. निसर्गाचे रूप खुलल्याने दरवर्षी कोयनेत पावसाळी पर्यटनाला बहर येतो.
कोयनेतील अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची तोबा गर्दी होते. ओझर्डे धबधबा पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल असतो. मात्र, यंदा नवजा येथील जनवन समिती आणि वन्यजीव विभागा यांच्यातील वादामुळे ओझर्डे धबधब्यावरील पर्यटनास जून महिन्यात बंदी घालण्यात आली होती. ही बंदी वन्यजीव विभागाने 7 जुलैला उठवली. तेव्हापासून आतापर्यंत नऊ हजार 455 पर्यटकांनी धबधब्याला भेट दिली. येथील पर्यटनातून दोन महिन्यात 9 लाख 43 हजार 600 रुपयांचा महसूल वन्यजीव विभागाने गोळा केला आहे. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी भूस्खलन झाले, तरी धबधब्याचे सौंदर्य अबाधित राहिले आहे. धबधब्यावर प्रवेश करण्यासाठी वन्यजीव विभागाने अव्वाच्या सव्वा प्रवेश शुल्क आकारल्याने पर्यटक नाराजी व्यक्त आहेत. धबधब्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असले, तरी वन्यजीव विभाग हा परिसर विकसित करत नाही. वजराई धबधबा, कास पठार या धर्तीवर ओझर्डे धबधब्याचा विकास गरजेचे आहे.
या धबधब्याचे व्यवस्थापन जनवन समितीकडे देण्याची मागणी आम्ही केली आहे. व्यवस्थापनाचा अधिकार मिळाल्यास या परिसराचा विकास, स्थानिकांना रोजगार आणि नवजा हद्दीत वर्षभर पर्यटन सुरू ठेवण्याचा आराखडा व नियोजन समितीकडे आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाकडे असलेले धबधब्याचे व्यवस्थापन तातडीने जनवन समितीकडे देण्यात यावे.
महेश शेलार,अध्यक्ष, नवजा जनवन समिती.