होळी खेळून परतणाऱ्या प्रवाशांनी भरलेली टॅक्सी दरीत पडून चार तरुणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील पैठणी भागातील आहे. ऐन होळीचा सण असताना ही घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या टॅक्सीमध्ये 14 प्रवासी प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीवरून असे आढळून आले आहे की, टॅक्सी ओव्हरलोड होती आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते. त्यामुळे टॅक्सीचा तोल बिघडला आणि सरळ दरीत कोसळली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आला आहे.