1 कोटी 65 लाख बांधकाम मजुरांना महिना भर रेशन फुकट
लखनौ – करोना विषाणुच्या प्रादुर्भावाने अनेक ठिकाणचे व्यवहार बंद ठेवावे लागल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मुजरांचे मोठेच हाल सुरू झाले आहेत या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारने तेथील 35 लाख मजुरांना प्रत्येकी एक हजार रूपयांची मदत घोषित केली असून बांधकामावर असलेल्या 1 कोटी 65 लाख मजुरांना महिना भराचे रेशन फुकट देण्याचाहीं निर्णय राज्य सरकारने घोषित केला आहे.
अत्यंदोय योजना आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांधकाम मजुरांना एप्रिल महिन्यापर्यंतचे रेशन फुकट दिले जाणार आहे. ज्या रोजंदारी मुजरांकडे रेशन कार्ड नाही त्यांना ते अग्रक्रमाने जारी करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. मनरेगा योजनेतील मजुरांना तातडीने वेतन देण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शहरातील सायकल रिक्षा चालकांनाही मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री अदित्यनाथ यांनी येत्या रविवारी जनता कर्फ्युचा आदेश उत्स्फुर्तपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. त्या दिवशी राज्य परिवहन, मेट्रो, इत्यादी सार्वजनिक परिवहन सेवा बंद ठेवली जाणार आहे. उत्तरप्रदेशात करोनाचे 23 रूग्ण आढळून आले आहेत.