आझम खान यांना अडकवण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न

– सपा आमदारांचा आरोप

लखनौ- उत्तर प्रदेश सरकार समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांना जमिन बळकावण्याच्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप समाजवादी पार्टीच्या आमदारांनी आज विधानसभेमध्ये केला. सपाचे सदस्य नरेंद्र वर्मा यांनी शून्य प्रहरादरम्यान स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. विरोधकांना संपवण्यासाठी हे कारस्थान केले जात असल्याचा आरोप विधानसभेतील सपाचे विरोधी पक्ष नेते राम गोविंद चौधरी यांनी केला.

आझम खान यांच्याविरोधात वैर भावनेतून तब्बल 12 वर्षांनंतर “एफआयआर’ दाखल करण्यात आले आहे. समाजवादी पार्टीला आणि अल्पसंख्यांकांना अपमानित करण्यासाठीच हे कारस्थान केल्याचे त्यांनी संगितले. रामपूर येथे सर्वपक्षीय समिती पाठवून आझम खान यांच्याबाबतच्या आरोपांची माहिती घेण्यात यावी, असेही चौधरी यांनी सांगितले.

मात्र आझम खान यांच्याविरोधात कायद्यानुसारच प्रकरण दाखल करण्यात आल्याचे विधीमंडळ कामकाज राज्यमंत्री सुरेश खन्ना यांनी सांगितले. आझम खान यांच्या मालकीचे मौलाना मोहम्मद अली जौहर विद्यापिठ ज्या जागेवर आहे, ती जागा दलितांच्या मालकीची आहे, असा रामपूर जिल्हा प्रशासनाचा सविस्तर अहवालच त्यांनी वाचून दाखवला. गरीब, वंचित आणि श्रमिकांच्या जमिनी बळकावून जर शैक्षणिक संस्था उभारली असेल, तर त्याचे कौतुक असता कामा नये, असे ते म्हणाले.

त्यावर आझम खान यांच्याविरोधातील तक्रारीसाठी स्थानिक पोलिसांनी तक्रारदारांवर दबाव आणल्याचा आरोप चौधरी यांनी केला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सभापती हृदय नारायण दीक्षित यांच्याकडे केली. समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी नंतर सभागृहातील मोकळ्या जागेत एकत्र येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.