#INDvsWI : विंडीजचा संघ जाहीर; सुनील नरेन व कायरन पोलार्डचे पुनरागमन

सेंट जॉन, अँटिग्वा  – भारताविरूद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचा 14 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला असून अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन व कायरन पोलार्ड यांचे पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेळाडू भारताविरूद्ध नेहमीच चांगली कामगिरी करीत असल्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे.

फ्लोरिडामधील लॉडरहिल येथील ब्रॉबर्ड कौंटी स्टेडियमवर दिनांक 3 व 4 ऑगस्ट रोजी हे सामने होणार आहेत. दिनांक 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या तिसऱ्या व अंतिम टी-20 सामन्याकरिता संघ नंतर निवडला जाणार आहे. कार्लोस ब्रेथवेटकडे वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या संघात आंद्रे रसेल यालाही स्थान मिळाले आहे. मात्र, शारीरिक तंदुरुती चाचणीत तो शंभर टक्के तंदुरुस्त असेल तरच त्याला खेळविण्यात येणार आहे. इंग्लंडमधील विश्‍वचषक सुरू असताना त्याच्या डाव्या गुडघ्यास दुखापत झाली होती व त्त्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून माघारही घ्यावी लागली होती.

वेस्ट इंडिज क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे प्रभारी अध्यक्ष रॉबर्ट हेन्स यांनी हा संघ जाहीर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिलेल्या ख्रिस गेलने या मालिकेतून माघार घेतली असून तो कॅनडात होणाऱ्या टी-20 स्पर्धेत सहभागी होणार आहे.

डावखुरा सलामीवीर जॉन कॅम्पबेल व डावखुरा फिरकी गोलंदाज खॅरी पिअरी यांना या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. आगामी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचा विचार करताना त्यांच्या बाजूने झुकते माप टाकण्यात आले आहे. त्यांच्या निवडीचे समर्थन करताना हेन्स यांनी सांगितले की, आम्ही केवळ या मालिकेचा विचार केला नसून आम्ही टी-20 विश्‍वचषकाचाही विचार केला आहे. आम्ही या सामन्यांचे यजमान असल्याचा आम्हाला फायदा मिळणार आहे. तरीही एक दिवसीय विश्‍वचषक स्पर्धेतील भारताची कामगिरी लक्षात घेऊनच आम्ही तुल्यबळ संघ निवडला आहे. या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा चांगला समतोल साधला गेला आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना वरिष्ठ खेळाडूंकडून खूप शिकायला मिळणार आहे. भावी काळाकरिता संघ बांधणीसाठीही त्याचा फायदा मिळणार आहे.

फिरकी गोलंदाज नरेन याने जवळ जवळ दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये टी-20 सामना खेळला होता. पोलार्डने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यात सामना खेळला होता. त्यामुळेच त्यांच्या समावेशाबाबत आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.

त्याविषयी हेन्स म्हणाले की, या दोन्ही खेळाडूंची भारताविरूद्धची कामागिरी नेहमीच चांगली असते. तसेच आयपीएलमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळत असल्यामुळे त्यांना भारतीय खेळाडूंचा भरपूर अभ्यास आहे. तसेच हे दोनही खेळाडू अद्यापही शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबाबत अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचा आमच्या संघास खूप उपयोग होणार आहे.

यष्टीरक्षकाबाबत हेन्स म्हणाले की, ‘निकोलस पूरन याने विश्‍वचषक स्पर्धेत फलंदाजीतही चांगले यश दाखविले आहे. त्याला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून अँन्थोनी ब्रॅम्बेल याचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारताविरूद्धचे सामने रंगतदार होतील अशी मला खात्री आहे’.

संघ – कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सुनील नरेन, किमो पॉल, खॅरी पिअरी, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, आंद्रे रसेल, ओशानी थॉमस, अँन्थोनी ब्रॅम्बेल (यष्टीरक्षक), जॉन कॅम्पबेल, शेल्डॉन कॉट्रेल, शिमरोन हेटमेयर, एविन लुईस

सुनील नरेन याची दृष्टीक्षेपात टी-20 मधील कामगिरी :

फलंदाजी : 48 सामने, 20 डाव, 147 धावा, 30 सर्वाधिक

गोलंदाजी : 46 डाव, 50 विकेट्‌स (1034 धावांमध्ये), 4-12 ही सर्वोत्तम कामगिरी

कायरन पोलार्ड याची दृष्टीक्षेपात टी-20 मधील कामगिरी

फलंदाजी : 59 सामने, 50 डाव, 788 धावा, 2 अर्धशतके, नाबाद 63

गोलंदाजी : 36 डाव, 23 विकेट्‌स (710 धावांमध्ये), 3-30 सर्वोत्तम कामगिरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)