दखल: समाजोन्नतीसाठी जेष्ठांच्या ऊर्जेचा वापर

वसंत बिवरे

समाजोन्नतीसाठी ज्येष्ठांच्या ऊर्जेचा वापर या विषयावर बोलायचे म्हटले तर समाज, उन्नती, ज्येष्ठ आणि ऊर्जा या चार शब्दांचा सारासार विवेक जागेवर ठेवून साकल्याने विचार केला पाहिजे तरच त्याला अर्थ प्राप्त होईल.

प्रथम आपण “समाज’ म्हणजे काय ते पाहू. समाज म्हणजे लोकसमुदाय. यामध्ये अनेक जाती-धर्माचे, विचारांचे लोक असतात. अशा सर्व लोकांचा मिळून समाज बनलेला असतो. “उन्नती’ म्हणजे व्यक्‍तीने किंवा कोणीही त्या त्या विषयात अथवा क्षेत्रात गाठलेली उंची होय. वृद्धी किंवा उत्कर्षही म्हणता येईल. आजचा समाज प्रगत आहे, असे आपण म्हणतो. याचाच अर्थ असा की मानवाने विविध संशोधनातून समाजोपयोगी व मानवी सुखासाठी नवनिर्मिती केली म्हणूनच समाजाची प्रगती झाली. मानवाची आणि समाजाची उन्नती यांचा निकटचा संबंध आहे. “ज्येष्ठ’ या शब्दाचा अर्थ पाहू. ज्येष्ठ याचा एक अर्थ सर्वात मोठा, घरातील वडीलधारा किंवा वयाने थोर वा वरिष्ठ असाही होतो. दुसरा अर्थ होतो सर्वोत्तम, उत्कृष्ट’.

“ऊर्जा’ म्हणजे शक्‍ती, हिंमत, एनर्जी किंवा तजेला होय. कोणत्याही कामासाठी ऊर्जा ही आवश्‍यक बाब असते. ऊर्जेशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही.ऊर्जा मिळविण्याचे अनेक स्रोत आहेत जसे जलऊर्जा, सौरऊर्जा वगैरे.
समाज, उन्नती, ज्येष्ठ व ऊर्जा या चार शब्दांच्या अनुषंगाने आपण आता मूळ विषयाकडे वळू. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहूनच त्याला स्वत:ची उन्नती करता येऊ शकते. व्यक्‍तीची उन्नती झाली तरच समाजाची उन्नती होते. व्यक्‍तिगत उन्नतीतूनच तो सामाजिक उन्नती साधत असतो. सामाजिक उन्नती झाली तरच त्याच्या व्यक्‍तिगत उन्नतीला अर्थ प्राप्त होतो. आज समाजामध्ये ज्येष्ठांची संख्या खूप आहे परंतु ज्येष्ठ कोणाला म्हणायचे हा ही एक मोठा प्रश्‍न आहे.

केवळ वय वाढले म्हणून तो ज्येष्ठ असे म्हणता येत नाही. अनुभवानेही आणि ज्ञानानेही माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त होते. एखाद्या विषयात कोणी सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त केले असेल तर तो ज्ञानश्रेष्ठ. म्हणूनच वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध असे शब्द प्रयोग प्रचलित झाले. खऱ्या अर्थाने जो श्रेष्ठ आहे त्याच्या साठीच असे शब्द वापरले जातात. आज समाजामध्ये वयोवृद्ध खूप आहेत तसेच ज्ञानवृद्ध, तपस्वी लोकही खूप आहेत. या लोकांमध्ये अनेकांत एक प्रकारची अज्ञात ऊर्जा दडलेली असते.त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी नक्‍कीच करता येऊ शकेल. ज्यांच्याकडे अशी ऊर्जा आहे व काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांना समाजप्रवाहात आणून त्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर समाजाच्या उन्नतीसाठी सहज करता येऊ शकेल. अजूनही अनेक ज्येष्ठ स्वेच्छेने समाजोन्नतीसाठी कार्य करीत आहेत व बरेचजण असे काम करायलाही तयार आहेत.

प्रत्येक क्षेत्रात ज्येष्ठांनी मिळविलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ समाजोन्नतीसाठी नक्‍कीच करता येईल यात शंका नाही. मग ते शिक्षणक्षेत्र असो, औद्योगिकक्षेत्र अथवा कोणतेही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रातील अनुभवाने व ज्ञानाने ज्येष्ठ अशा तज्ज्ञ ज्येष्ठांच्या ऊर्जेचा वापर करता आला तर समाजातील अनेक प्रश्‍न मार्गी लागतील व यामुळे समाजाची उन्नती होईल यात तिळमात्र शंका नाही.

आता प्रश्‍न असा आहे की अशा ज्येष्ठांच्या ऊर्जेचा वापर कोठे, कसा आणि कोणी करावा? एका कवीने म्हटले आहे की, “वृद्ध वृद्ध म्हणुनी कां करिता आमचा छळ, अजून आहे आमच्या मध्ये लढण्याचे बळ’ भलेही त्यांच्याकडे शारीरिक बळ नसेल परंतु मानसिक बळ प्रचंड असते. अशी माणसे कोणत्याही प्रसंगी डगमगून जात नाहीत. त्यांचा हा अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरू शकतो. म्हणूनच मोठी माणसे लहानांना “हे करू नको ते करू नको’ असे सांगत असतात. याचे कारण हेच असते की त्यांना तसा अनुभव आलेला असतो. समाजाच्या बाबतीत ही असे अनेक अनुभव ज्येष्ठांच्या गाठीशी असतात. अशा अनुभवातूनच त्यांनी ऊर्जा साठवलेली असते. या ऊर्जेचा समाजाच्या उन्नतीसाठी वापर करता आला पाहिजे.

आजही समाजात अनेक समस्या आहेत. त्या त्या समस्यांबाबत ज्येष्ठांचे काय अनुभव आहेत हे त्यांना विचारून त्यांच्या अशा अनुभवांचा समाजाच्या उन्नतीसाठी खुबीने वापर केला तर समाज एक दिवस समस्यामुक्‍त झाल्या शिवाय राहणार नाही असा विश्‍वास वाटतो. शिक्षण, व्यवसाय, उद्योग, स्वच्छता, आरोग्य, गरिबी अशा कितीतरी समस्या आज भेडसावत आहेत. अशा समस्यांसाठी ज्येष्ठांच्या अनुभवांचा, ज्ञानाचा उपयोग नक्‍कीच होऊ शकेल. यासाठी अशा ज्येष्ठांना सर्वप्रथम समाजामध्ये मानाचे स्थान दिले पाहिजे. त्यांचे अनुभव संग्रहित करून ठेवले पाहिजेत. त्याचा उपयोग कौशल्याने करता आला पाहिजे.

आज समाजामध्ये वृद्धांची समस्या खूप मोठी आहे. या समस्यातून वृद्धच मार्ग काढू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. ज्येष्ठांकडे मानसिकबळ असले तरी त्यांना सामाजिक बळ किंवा पाठिंबा सहजासहजी मिळत नाही हे वास्तव आहे. समाजाने या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तरच त्यांची ऊर्जा समाजासाठी प्राप्त होऊ शकेल.
ज्येष्ठ नागरिकांच्या कितीतरी संघटना आहेत ज्या ज्येष्ठांच्या ऊर्जेचा वापर करूनच सामाजिक कार्य करीत आहेत. अशा संघटनांना काही उद्दिष्ट ठरवून देऊन त्याप्रमाणे काम दिले तर ते काम ते नक्‍कीच करू शकतील. परंतु दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून संपूर्ण सहकार्य मिळायला पाहिजे तरच त्यांच्या ऊर्जेचा वापर खऱ्या अर्थाने समाजाच्या उन्नतीसाठी करून घेता येईल.

ज्येष्ठांची ऊर्जा समाजोन्नतीसाठी राबवायची असेल तर शासकीय पातळीवरही निवृत्तांना त्यांचे पारंगत व योगदानित क्षेत्रात सेवा प्रवृत्त करण्यासाठी व त्यांचा सन्मानपूर्वक सहभाग घेण्यासाठीही नियोजनपूर्वक एखादी योजना राबवली गेली पाहिजे व त्याचा सकारात्मक प्रपोगंडा ही मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. अशा योजनांची फलश्रुती ही निश्‍चितच समाजोन्नतीसाठी पूरक ठरेल असा विश्‍वास वाटतो.

Leave A Reply

Your email address will not be published.