कुळधरणच्या कुमार जगताप यांचा प्रयोग; व्हिडिओद्वारे मार्गदर्शन
कर्जत – सध्या मका पिकावर अमेरिकन अळीने केलेल्या हल्ल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कीटकनाशकांचा वापर करूनही अळीवर नियंत्रण येत नसल्याने शेतकऱ्यांनी अळी नियंत्रणासाठी विविध प्रयोग सुरू केले आहेत. तालुक्यातील कुळधरण येथील शेतकरी कुमार जगताप यांनी आपल्या शेतात मका पिकावरील अळीवर नियंत्रण आणण्यासाठी डिटर्जंटचा वापर सुरू केला आहे. या वापरातून अळीचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अमेरिकन अळीच्या प्रश्नावर कृषी विभागही दक्ष झाला आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विविध उपक्रम कार्यक्रम घेऊन माहिती दिली जात आहे. कुळधरण येथील कुमार जगताप यांनी अळीच्या नियंत्रणासाठी डिटर्जंट पावडर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी तसेच बाटलीने पोग्यांमध्ये डिटर्जंटचे पाणी ओतल्याने अळी बाहेर येवून तिचा नाश होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल करून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा उपक्रम राबविला आहे. कमीत कमी खर्चात अळीचे नियंत्रण शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 15 लिटर पाण्यात 300 ग्रॅम डिटर्जंट पावडर टाकून त्याचा वापर करावा असा सल्ला ते शेतकऱ्यांना देत आहेत.