दौंडचा आमदारही भाजपचाच हवा

मित्रपक्ष रासपच्या मतदारसंघात भाजप जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन

दौंड – राज्याचा विकास भाजप सरकारच करू शकते म्हणूनच कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपात येत असल्याने दौंडचा आमदारही आपलाच असायला पाहिजे, असा निश्‍चय जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दौंड शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.

भाजपचा मित्रपत्र असलेल्या रासप या पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या मतदारसंघात गणेश भेगडे हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचे शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे संघटन सरचिटणीस सचिन सदावर्ते, बाळासाहेब गरुड, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नामदेव ताकवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शर्मा, स्वप्निल शहा, शहराध्यक्ष फिरोज खान आदी यावेळी उपस्थित होते.

भेगडे म्हणाले, जिल्ह्यात फिरत असताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पक्षाचे काम हे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असून सध्या पक्षाला चांगले दिवस आले आहेत. केंद्रात पक्षाची सत्ता असून राज्यातही सत्ता आहे. ज्याप्रमाणे मावळमध्ये जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीपर्यंत आपला आमदार आहे. दौंड तालुक्‍यात जनसंघाच्या तिकिटावर स्व. राजाराम ताकवणे हे आमदार झाले होते. त्यामुळे दौंड तालुका हा भाजपच्या बाजूने आहे. दौंड तालुक्‍यात 40 ते 45 हजार भाजपच्या सदस्य नोंदणी तुम्ही करा, त्यानंतर आम्ही प्रदेशकडे जाऊन दौंडची जागा आपल्या हक्काची असणारी आम्हाला मिळावी, अशी मागणी करू शकतो. सध्या मतदार नोंदणी सुरू असून मतदार नोंदणीचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे सांगत या नवमतदारांमुळेच आज केंद्रात व राज्यात आपली सत्ता आली आहे. हा नवमतदार विकासाच्या बाजूने भाजपच्या मागे उभा राहिलेला आहे.

तिकीट मागणे गैर नाही
निवडणुकीसाठी तिकीट मागणे व इच्छा व्यक्त करणे हे काही गैर नाही; परंतु एकदा पक्षाने एखाद्यास उमेदवरी जाहीर केल्यानंतर त्या व्यक्तीचे काम करायचे असते. कारण निष्ठा ही बोलण्याची गोष्ट नसून ती दाखवण्याची गरज असते. सध्या अनेक नेते-कार्यकर्ते भाजपत येत आहेत. तशाच पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षातील चांगल्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात हात घालून त्यांना पक्षात आणता येते की काय, याची चाचपणी करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)