आनंदऋषीजी म.सां.च्या 119व्या जयंती निमित्त उपक्रम
डॉ. बोरगे : हृदयरोग शिबिरात 259 रुग्णांची मोफत तपासणी
नगर – आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेचा वटवृक्ष बहरला असून, त्याची सावली सर्वसामान्यांना मिळत आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना उपचार घेणे अशक्य झाले असताना हे हॉस्पिटल सर्वसामान्यांचा आधार बनला आहे. ह्रद्यरोग शस्त्रक्रियेसाठी अद्यावत, सुसज्ज व सेवाभावाने कार्य करणारे हॉस्पिटल म्हणून संपुर्ण राज्यात आनंदऋषीजी हॉस्पिटलची ओळख निर्माण झाली असून, परिस्थितीची जाणीव ठेऊन येथे रुग्णांना सेवा दिली जात असल्याची भावना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषी म.सा. यांच्या 119 व्या जयंती निमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये लोढा परिवाराच्या सहकार्याने आयोजित हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन डॉ.बोरगे व जयकुंवरबाई मोतीलाल लोढा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी डॉ.बोरगे बोलत होते. याप्रसंगी सुरेंद्र लोढा, निखलेंद्र लोढा, महेंद्र लोढा, सविता लोढा, स्मिता लोढा, मनिषा लोढा, जितेंद्र लोढा, प्रितेश लोढा, कोमल लोढा, आरवी लोढा, सुदर्शन लोढा, कु.निधी लोढा, डॉ.आशिष भंडारी, सामाजिक कार्यकर्ते सुमतीलाल मुथा, सुभाष भांगे, कार्डियाक सर्जन डॉ.संदिप तडस, डॉ.वसंत कटारिया, कार्डिओलॉजीस्ट डॉ.किरण दिपक, डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.अनिकेत कटारिया, डॉ.राहुल एरंडे, डॉ.विनय छल्लाणी, डॉ.प्रविण डुंगरवाल, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.स्वागत ससाणे आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ.वसंत कटारिया यांनी तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने अल्पदरात दर्जेदार सेवा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दिली जात आहे. ह्रद्यरोग शस्त्रक्रियेसाठी संपुर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. जिल्ह्यात अद्यावत एकमेव ह्रद्यशस्त्रक्रिया विभाग असून, आजतागायत येथे 12 हजारपेक्षा अधिक ह्रद्यरोगाच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. बायपास, वॉल रिप्लेसमेंट, ह्रद्यरोग जन्मजात दोष, ह्रद्याचे छिद्र बुजवणे, लहान मुलांच्या ह्रद्यासंबंधी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे यशस्वी केल्या जात असल्याने संपुर्ण भारतात हॉस्पिटलाचा नांवलौकिक वाढला आहे. कॅथलॅब व कार्डियॉलॉजी विभागात 30 हजारपेक्षा जास्त ऍन्जिओग्राफी, 10 हजार पेक्षा अधिक ऍन्जिओप्लास्टी, पेसमेकर, बी.एम.व्ही. आदि शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, ईसीजी व टूडीईको माफक दरात उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णसेवेसाठी लोढा परिवाराचे मोठे योगदान तर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.बोरगे यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
महेंद्र लोढा , निधी लोढा यांनी आरोग्य सेवेची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल हॉस्पिटलचे आभार मानून, अत्यल्पदरात मोठ्या शहरांपेक्षा अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवल्या जात असल्याने रुग्णसेवेसाठी सर्वपरीने सहकार्य करणारे व्यक्ती व डॉक्टरांचे त्यांनी कौतुक केले. बडी साजन श्रीसंघाच्या विश्वस्तपदी महेंद्र लोढा यांची निवड झाल्याबद्दल हॉस्पिटलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबीरात 259 रुग्णांची मोफत हृद्य तपासणी करण्यात आली. तर यामध्ये बायपास, ऍन्जिओप्लास्टी, ऍन्जिओग्राफी, बीएमव्ही व हृद्यातील झडप बदलण्याची शस्त्रक्रिया अत्यल्पदरात केल्या जाणार आहेत. तसेच महात्मा फुले ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत या हृद्य शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. या शिबीरासाठी जिल्ह्यासह राज्यातील रुग्णांनी हजेरी लावली होती. पाहुण्यांचे स्वागत डॉ.आशिष भंडारी यांनी केले. आभार सतीश (बाबुशेठ) लोढा यांनी मानले.