पुणे – राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेत ब्ल्यू टूथ उपरकणाचा वापर करून लेखी परिक्षा देणाऱ्या एकास अटक करण्यात आली. याप्रकरणी विशाल गबरूसिंग बहुरे (रा. जोडवाडी, ओैरंगाबाद) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या भावा विरोधात फसवणूक, महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परिक्षांमध्ये होणारे गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ७ अन्वये् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्यवेक्षक अनुप पवार (वय ४२) यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या जामखेड येथील गटात भरती होणार असून भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेचे रविवारी (१२ डिसेंबर) हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. बहुरे त्याच्या भावाचे नावाने लेखी परिक्षा देत होता. त्याने कानात ब्लू टूथ उपकरण घातले होते.
पर्यवेक्षक पवार यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी बंदोबस्तात असलेले बंडगार्डन वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक राजेश बोर्डे तसेच राज्य राखीव पोलीस दलातील उपनिरीक्षक निकम यांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी बहुरेला ताब्यात घेतले. त्याच्याकडील ब्ल्यू टूथ उपकरण ताब्यात घेण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर तपास करत आहेत.