नगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजकीय पक्ष, विविध संघटनांच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती निमित्त महत्वाच्या चौकात अर्धकृती, पूर्णाकृती पुतळे उभारून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने नगर शहर दुमदुमून गेले.
सायंकाळी मिरवणुकीस सुरवात झाली. या मिरवणुकीत 15 मंडळानी सहभाग घेतला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती गणेश कवडे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, पुष्पा बोरुडे, सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, प्रा. माणिक विधाते, प्रकाश भागानगरे, अजय साळवे यांसह नागरिकांनी अभिवादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी जयंतीनिमित्त काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मिरवणूक मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शहरासह डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नगर शहर, भिंगार, नगर तालुक्यातील अरणगाव, श्रीरामपूर शहर, संगमनेर शहर, कर्जत तालुक्यातील मिरजगाव, नेवासा, शेवगाव येथील मिरवणुकीवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात आली.
मिरवणुकीसाठी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक 1, अतिरिक्त पोलीस अधीक्षक 2, पोलीस उपअधीक्षक 6, परि. पोलीस उपअधीक्षक 2, पोलीस निरीक्षक 33, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक 105, पोलीस अंमलदार 775, एसआरपीएफच्या चार तुकड्या, आरसीबीच्या तीन तुकड्या, क्यूआरटीच्या दोन तुकड्या, ट्रॅकिंग फोर्स 11 असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.