न्यूयॉर्क :- अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत बेलारूसच्या आर्यना सबालेन्काने आगेकूच कायम राखली. पुरुषांच्या एकेरीत मात्र, गत स्पर्धेतील उपविजेता असलेल्या कॅस्पर रुडला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
चीनच्या झॅंग झिझेन याने रुडवर मात्र करत सर्वात सनसनाटी निकाल नोंदवला. झिझेन याने रुडवर 6-4, 5-7, 6-2, 6-0 असा सरळ चार सेटमध्ये पराभव केला. एटीपी क्रमवारीतील मानांकित खेळाडूचा पराभव करणारा झिझेन चीनचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. रूडने गेल्या सहा ग्रॅंडस्लॅम स्पर्धापैकी तीन स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे झिझेनच्या कामगिरीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
पुढील फेरीत झिझेनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या रिकी हिजिकाटा याच्याशी होणार आहे. पुरुष गटातील अन्य लढतीत स्टेफानोस त्सित्सिपासला पात्रता फेरीतून आलेल्या स्वित्झर्लंडच्या डॉमिनिक स्टिकर याने 7-5, 6-7, 6-7, 7-6, 6-3 असे नमवले. सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचने विजयी घोडदौड कायम राखताना स्पेनच्या बर्नाबे जापाटा मिरालेसवर 6-4, 6-1, 6-1 असा विजय मिळवला.
महिलांच्या एकेरीत सबालेन्काने ब्रीटनच्या जेड ऍना बुराजचा 6-3, 6-2 असा पराभव केला. फ्रान्सच्या क्लारा बुरेलनेही आश्चर्यकारक निकाल नोंदवताना चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हावर 6-4, 6-2 अशी मात केली.
अन्य लढतीत ओन्स जेबुरने लिंडा नोस्कोव्हावर 7-6, 4-6, 6-3 अशी मात केली. जेसिका पेग्युलानेही आगेकूच कायम राखताना पॅट्रीसिया मारियावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला. मारिया बुझकोव्हाने पेट्रा मॅट्रीकचा 6-1, 6-2 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.
मेदवेदेव, अल्कराझचेही वर्चस्व…
डॅनियल मेदवेदेवने ख्रिस्तोफर ओकोनेलवर 6-2, 6-2, 6-7, 6-2 अशी मात केली. कार्लोस अल्कराझने लॉईड हॅरीसवर 6-3, 6-1, 7-6 अशी तीन सेटमध्ये मात करत स्पर्धेची तिसरी फेरी गाठली.