सोलापूर – सोलापूरमधील होटगी गावाजवळ सिमेंटचा बल्कर उलटून झालेल्या अपघात 4 जणांचा मृत्यू झाला. ही घटना 1 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. मृतकांमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा समावेश आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट फॅक्टरीतून सिमेंट घेऊन सोलापूरच्या दिशेने जाणारा सिमेंटचा बल्कर औज (आ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर उलटला. उलटलेल्या सिमेंट बल्करखाली शाळकरी मुलांसह एका वृद्धाचा समावेश असल्याची माहिती समजते.
वळसंग पोलिसांची शोध मोहीम सुरू असून, आतापर्यंत बल्करखाली चेंगरलेली एक चिमुकली पोलिसांना सापडली आहे. वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले हे स्वत: त्याठिकाणी उपस्थित आहेत.
सिमेंट बल्कर चालक तेथून पसार झाल्याचीही माहिती पुढे येत आहे. अपघातस्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांकडून सिमेंट बल्कर उचलण्यात आला. मात्र यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.