बैरुत – सीरियामध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई कारवाईमध्ये इस्लामिक स्टेटचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून सीरिया आणि इराकमध्ये अधूनमधून हल्ले केले जात असतात. 2019 मध्ये सीरियातून इसिसचे उच्चाटन झाले आहे. मात्र तरिही या संघटनेच्या कारवाया अजूनही सुरूच असतात. म्हणून अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरने ही कारवाई केली होती, असे सेंट्रल कमांडने म्हटले आहे. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या या कारवाईचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. या कारवाईच्यावेळी या ठिकाणी कोणीही नागरिक उपस्थित नव्हते, असे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे.
सीरियातील हल्ल्यांमागे हात असलेले दोन दहशतवादी मारले गेले असल्याचे म्हटले गेले आहे. या दोन दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे इसिसच्या कारवायांना आळा बसेल, असेही म्हटले आहे.
Pakistan : पाकिस्तानात ‘FIA’च्या उपसंचालकांची गोळ्या घालून हत्या
देर अल झोर प्रांतातील अल जेर गावातील या कारवाईमध्ये कुर्दिश फौजांनीही भाग घेतला होता, असे “सिरीयन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राईटस’या ब्रिटनस्थित युद्ध निरीक्षकांनी म्हटले आहे. अमेरिकेचे 900 सैनिक सीरियामध्ये कुर्द बंडखोरांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक स्टेटविरोधी संघर्षात सक्रिय आहेत.