नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या नातलगांनी, कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालायला भाग पाडले.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलाच राग व्यक्त केला आहे.
“या घटनेबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. मध्य प्रदेशमध्ये १६ वर्षांच्या बलात्कार पीडितेला तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासोबतच दोरीने बांधून जाहीर मिरवणूक काढण्यात आली. हा सर्व अत्याचार सुरु असताना ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जात होत्या? आपण (समाज म्हणून) इथपर्यंत कसे आलो? हे कृत्य अमानवीय आहे”, अशा आशयाचे ट्विट करत उर्मिला यांनी आपला राग व्यक्त केला.
दरम्यान, या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. रविवारी हा प्रकार घडल्याचं समजतंय. व्हायरल व्हिडिओमध्ये पीडिता आणि आरोपीला एका दोरीने बांधून त्यांची धिंड काढताना दिसत आहे. त्यांच्या चहुबाजूला काही लोकं असून ते ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत आहेत.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पीडितेची जमावापासून सूटका केली. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकारी दिलीपसिंह बिल्वाल यांनी दिली.